अलिकडे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत चालली आहे. यासमस्येला तोंड देण्यासाठी तज्ज्ञ नेहमीच विविध मार्गदर्शन करत असतात. तासनतास एकाच ठिकाणी बसून टीव्ही बघणे, व्हिडिओ गेम खेळणे, मैदानी खेळ न खेळणे, जंक तसेच फास्ट फूड चे मोठेप्रमाण आदी कारणांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. शाळेत जाताना सुद्धा मुले स्कूलबस अथवा पालकांच्या वाहनातून जात असतात. मात्र, मुलांच्या लठ्ठपणा याच कारणांमुळे वाढतो असे नसून अन्य अनेक कारणे आहेत. मूल लठ्ठ होणार की नाही हे त्याच्या आईवरदेखील अवलंबून असते.

नक्की वाचा

एखाद्या गरोदरपणात महिलेच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर त्या महिलेच्या मुलाला लहान वयातच लठ्ठपणा बळावू शकतो. पीएलओएस वनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. यूएस मधील संशोधकांनी १९९५ ते २००४ दरम्यान प्रसूती झालेल्या ४० हजार पेक्षा जास्त गरोदर महिलांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मुलांच्या वयाच्या ५ ते ७ वर्षांपर्यंतच्या माहितीचा अभ्यास केला. या संशोधनात असे आढळून आले की, तपासणीत ज्या महिलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते.

मात्र गरोदरपणातील मधुमेह असण्याइतपत हे प्रमाण नव्हते, अशा महिलांच्या मुलांना वयाच्या ५ ते ७ व्या वर्षात लठ्ठपणाचा बळावण्याचा धोका वाढतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असलेल्या गरोदर महिलांच्या मुलांच्या तुलनेत रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या गरोदर महिलांची मुले लठ्ठ होण्याचा धोका १३ टक्क्यांनी वाढतो. जर महिलेला गरोदरपणात मधुमेह असेल तर मुले लठ्ठ होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी वाढतो. गरोदरपणात जर महिलेचे बीएमआय सामान्य असेल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असल्यास मुले लठ्ठ होत नाहीत.

लहान मुलांमधील लठ्ठपणाला प्रतिबंध करण्यासाठी हे संशोधन खूप महत्त्वाचे ठरले आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणा २ मार्गांनी रोखता येतो. एक म्हणजे महिलांनी गरोदरपणापूर्वी आपला बीएमआय नियंत्रित करावा आणि गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी कमी राहिल याची दक्षता घेतल्यास मुलांच्या लठ्ठपणाला प्रतिबंध करता येईल.