There is no Nandi in these temples in Kolhapur which is a masterpiece of ancient sculpture.

कोल्हापूर या शहरास खूप मोठा ऐतिहासिक (Historical) वारसा लाभला आहे. कोल्हापूरपासून 70 किमी. अंतरावर असलेल्या शिरोळ तालुक्यातील “खिद्रापूर” या गावी कृष्णा नदीच्या काठावर वसलेले श्रीकोपेश्वराचे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे.प्राचीन शिलाहार स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पाहताक्षणी मनाला भुरळ घालते. सातव्या शतकाच्या काळात चालुक्य राजवटीत या मंदिराची उभारणी करण्यात आली आणि अकराव्या ते बाराव्या शतकात शिलाहार राजवटीने हे काम पूर्ण केले. असे म्हटले जाते की, देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या बांधकामात योगदान दिले आहे.

या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. भगवान शिवाची पत्नी सती देवी तिचे वडील राजा दक्ष यांना शिव हा जावई म्हणून पसंत नव्हता. तेव्हा राजा दक्षाने एक मोठा यज्ञ केला आणि शिव व सतिला बोलावले नाही. सतीने याबद्दल आपल्या पित्याला जाब विचारला.हा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी घेतली. जेव्हा हे भगवान शिवास कळाले तेव्हा ते खूप क्रोधीत होऊन त्यांनी दक्ष राजाचा वध केला आणि कृष्णा तीरावर येऊन बसले. त्यावेळी भगवान विष्णू ने भगवान शिवाचा राग शांत केला.

म्हणून या मंदिराला कोप + ईश्वर म्हणजे “कोपेश्वर” असे म्हणतात. या मंदिराचे खास वैशिष्ट्य असे की, या मंदिरांमध्ये नंदी नाही. असे म्हटले जाते की, मंदिराच्या काही अंतरावर कर्नाटकातील यडूर या गावी फक्त नंदीचे मंदिर आहे.48 खांबांवर उभा असलेला हा सभामंडप वर्तुळाकार असून संपूर्णतः रिकामा आहे. या मंडपाचा वापर यज्ञ करण्यासाठी होत होता असे म्हटले जाते.

मंदिरात सहा झरोखे, सोळा किर्तीमुख, आठ फूट उंचीचा भग्न द्वारपाल, अठरा तारुण्य लतिका, अंतराळ गृह, गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी अंगभूत योजना अशी असंख्य वैशिष्ट्ये या मंदिरात पहावयास मिळतात.सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या लगत एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल दिसून येतात. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे ही आहेत. द्वारपालाच्या सुंदर मुर्त्या पाहून मन अगदी प्रसन्न होते.

सभा मंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूंना नक्षीदार जाळ्या बसवलेल्या असून यावर खूप सुंदर हत्ती कोरलेले आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी पाच-पाच द्वारपाल आहेत. त्यांचे आकार, कोरीव काम अगदी उठून दिसते.या मंदिराच्या शिल्पकलेतील खास वैशिष्ट्य म्हणजे “सुरसुंदरी”. या मंदिरावर कोरलेल्या सूरसुंदरींची शिल्पे अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश, दुर्गा अशी अनेक शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिराच्या बाहेरील भागात काही वीरगळ ही पाहायला मिळतात.2 जानेवारी 1954 ला भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिरास “महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक” म्हणून घोषित केले आहे. शिल्पकलेचा असलेला हा भांडार आपल्या डोळ्यांत टिपण्यासाठी नक्कीच या मंदिरास भेट द्या.