Get to know the performance of the man whose birthday is celebrated as Engineers Day!
 
१५ सप्टेंबर  हा दिवस “अभियंता दिन (इंजिनीयर्स डे)” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे एक महान सुपुत्र इंजिनिअर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटक राज्यातील मदन हळळी  (ता. चिक बल्लापूर) या खेड्यामध्ये स्वतःच्या सोन्यासारख्या लखलखीत बुद्धीने, कार्यनिष्ठेने व आदर्श विचारसरणीने हा मुलगा जगामध्ये एक थोर अभियंता म्हणून प्रसिद्ध पावला. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे विश्वेश्वरय्या नेहमी शिष्यवृत्ती मिळवत असत . चार्ल्स वाटर हे विश्वेश्वरय्या यांच्या शिक्षणाच्या काळात  सेन्ट्रल कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या हुशारीमुळे,तसेच धडपड्या परंतु विनम्र स्वभावामुळे  विश्वेश्वरय्या हे चार्ल्स यांचे सर्वात लाडके विद्यार्थी बनले होते. 

चार्ल्स सरांनी त्यांना वेब्स्टरची   डिक्शनरी आणि सोन्याची कफलीन्क्स भेट म्हणून दिली होती. विश्वेश्वरय्यानी मरेपर्यंत या दोन्ही वस्तू प्राणपणाने जपून ठेवल्या होत्या. इसवी सन १८८१ मध्ये विश्वेश्वरय्यानी बी ए ची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली. म्हैसूरचे दिवाण श्री  रंगाचारलू यांच्याकडे चार्ल्स सरांनी शब्द टाकल्यामुळे म्हैसूर राज्य सरकारने राज्याबाहेर म्हणजे पुणे येथे अधिक शिक्षणासाठी विश्वेश्वरय्या यांना शिष्यवृत्ती देऊ केली आणि विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग शिकण्यासाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दाखल झाले. इसवी सन १८८३ साली ते एल सी ई आणि  सी ई या दोन परीक्षा पूर्ण मुंबई रेसिडेन्सीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वयाच्या तेविसाव्या वर्षी या स्पृहणीय यशाबद्दल त्यांना मानाचे जेम्स बर्कले पदक मिळाले.विश्वेश्वरय्या यांची पहिली नेमणूक  पब्लिक वर्क्स डिपार्टर्मेंट मुंबई या खात्यामध्ये असिस्टन्ट  इंजिनिअर म्हणून झाली. या खात्यात ते मार्च 1884 मध्ये रुजू झाले तरीही त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इरिगेशन इंजिनिअरिंग हा विषय शिकविण्यासाठी बोलावले जात असे. नोकरीच्या सुरुवातीलाच धुळे जिल्ह्यातील दातारी या खेड्यातील  पांजरा या नदीवर सायफन बांधण्याचे आव्हानात्मक काम श्री . विश्वेश्वरय्या यांच्यावर सोपविण्यात आले. त्यांचे एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर एच जी  पालीसार यांनी भर पावसात विश्वेश्वरय्या यांना असा दम भरला की जर मुसळधार पावसाचे कारण सांगून तुम्ही काम थांबवले तर तुमच्या अहवालावर संशयास्पद निष्ठा असा शेरा मारला जाईल. भर पावसाचे आव्हान श्री. विश्वेश्वरय्यानी स्वीकारले आणि ठरलेल्या मुदतीमध्ये पांजरा नदीवर सायफन बांधला. त्यामुळे पूर येण्याची शक्यताच नाहीशी झाली. पालीसार यांनी त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये  उत्कृष्ट असा शेरा देऊन विश्वेश्वरय्या यांची खूप प्रशंसा ही केली. त्याच पालीसारसाहेबांनी विश्वेश्वरय्या  यांना खात्याच्या विविध परीक्षांना बसण्यासाठी प्रवृत्त केले. विश्वेश्वरय्यासुद्धा अशा खात्यांच्या परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे त्यांनी मराठी या विषयामध्ये खूपच गुण मिळवले. या खाते परीक्षा (डिपार्टमेंटल एक्झामिनेशन) उत्तीर्ण झाल्याने विश्वेश्वरय्या यांना केवळ २० महिन्यान्च्या  नोकरीनंतर प्रथम श्रेणी (क्लास वन ) अधिकारी म्हणून बढती मिळाली.    सक्कर येथील आवाहनात्मक काम : 
  सन १८९४ मध्ये सक्कर शहराला सिंधू नदीतून पाणीपुरवठा करण्याचे काम श्री. विश्वेश्वरय्या यांना करावयाचे होते.  हे काम आव्हानात्मक होते.  त्यांनी सिंधू नदीच्या पात्रातच एक विहीर खणली आणि जमिनीखालून तिला एक बोगदा खणून जोडला.  ते वाळूतून गाळून आलेले पाणी  बोगद्यातून  त्यांनी एका उंच डोंगरावर नेले. तिथे एक जलाशय बांधून उताराने  पाईप घालून  ते पाणी त्यांनी सक्कर शहराला पुरवले.  विश्वेश्वरय्या यांनी सक्कर शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असा सोडवला . या यशस्वी कामगिरीमुळे तापी नदीतून सुरत शहराला पाणीपुरवठा करण्याचे काम विश्वेश्वरय्या यांच्यावर सोपविले गेले. भडोच आणि सुरत या शहरांचे कार्यकारी अभियंता (एक्झीक्युटिव्ह इंजिनिअर ) म्हणून  विश्वेश्वरय्या यांनी सुमारे अकरा महिने काम पाहिले.

 
धरणांच्या स्वयंचलित दरवाजांचा शोध 
 सुरत येथून श्री विश्वेश्वरय्या यांची पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये  असिस्टन्ट  टू चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली . पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे . या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी कॅंटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे . मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे (हेड ऑफ वाटर कोलम ) धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ? श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. त्यांनी सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या अक्कल हुशारीने स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमाटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने या ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. 


जलसिंचनाची नवीन पद्धत 
 पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली . कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हते त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

विश्वेश्वरय्या यांच्या बुद्धिमत्तेचे भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे . तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही . सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया (हिंवताप ) सारख्या  रोगालाही आळा  बसला .

एडनमध्ये येथील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपविले 

मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये काम करीत असतानाच श्री  विश्वेश्वरय्या यांची इसवी सन १९०६ मध्ये भारत सरकारने वरिष्ठ  इंजिनिअर (सीनियर इंजिनिअर) म्हणून एडन या शहरात नियुक्ती केली. हे समुद्राकाठचे शहर एक मोक्याचे बंदर आहे. एडन हे भारतातून जातांना सुवेझ कालव्याच्या प्रवेशद्वारा जवळील पहिलेच बंदराचे शहर असल्यामुळे एडन शहर ब्रिटिशांना फार महत्वपूर्ण वाटत होते व त्यामुळे  ब्रिटीश लोक त्या शहराची विशेष काळजी घेत असत. सन एकोणीसशे सहा मध्ये एडनमध्ये पाण्याचे फार दुर्भिक्ष्य होते . तेथील लोक समुद्राचे खारे पाणी उर्ध्वपातन करून पिण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वापरत असत. त्यामुळे तेव्हा २०  रुपये १२  ग्र्याम हा सोन्याचा दर असताना  तिथल्या लोकांना ३ रुपये १०० ग्यालन (एवढ्या रुपयात तेव्हा  १.७५ ग्र्याम सोने आले असते.) या दराने पाणी विकत घ्यावे लागत असे. सामान्य लोक खेचरांवरून लांबून पखालीत भरून आणलेले पाणी विकत घेत त्याचा दरसुद्धा  १ ते दीड रुपया १०० ग्यालन असा होता . त्याकाळी ब्रिटिशांना एडन शहराला पाणी पुरवण्यासाठी दर वर्षी ७ लाख रुपये खर्च येत असे. एडन शहराच्या जवळ ६ मैलांवर छोटे छोटे डोंगर होते आणि त्या तिथल्या ओढ्यांना पाणी यायचे पण तिथे पाउसच कमी पडतो त्यामुळे ते पाणी मध्येच जमिनीत झिरपून लुप्त होत असे.

 श्री  विश्वेश्वरय्यानी या  सर्व भागाचे सर्वेक्षण करून एक योजना तयार केली . लहेज येथे एक विहीर खोदून त्यातील पाणी एका उंच टेकडीवर चढवायचे आणि तिथून पाईप लाईन  घालून ते पाणी एडन शहरात आणायचे अशी ती योजना होती . लहेज हा डोंगराळ भाग तिथल्या एका आदिवासी सुलतानाच्या आधिपत्याखाली होता . त्यामुळे त्याच्याशी वाटाघाटी करून करार करावा असेही श्री  विश्वेश्वरय्यानी सुचवले. त्याप्रमाणे करार होउन ते काम सुरु झाले आणि ते काम यशस्वीरीत्या पूर्ण करून श्री  विश्वेश्वरय्यानी एडनला पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा सुरु केला . हे पाइप जमिनीखालून टाकताना त्यांनी एक तौलनिक अभ्यासही केला . त्यानुसार त्यांनी असे दाखवून दिले की जर सांडपाण्याचा निचरा भूमिगत पाइप वापरून केला तर जनतेत रोगराई कमी पसरते व मृत्यूचे दर हजारी प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. श्री  विश्वेश्वरय्या यांच्या या संशोधनाचाही ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये फार बोलबाला झाला व त्यांना कैसर ए हिंद या पदकाने सन्मानित करण्यात आले.

कोल्हापूर बंधारा दुरुस्ती 

त्याकाळी कोल्हापूर हे संस्थान राजाराम महाराजांच्या वंशजांच्या आधिपत्याखाली होते. कोल्हापूरला मातीच्या बंधाऱ्याच्या जलाशयातून पाणीपुरवठा होत असे. एकदा  या बंधाऱ्याचा काही भाग फुटून पूर्ण बंधारा फुटण्याचा संभव निर्माण झाला. तेव्हा त्याची दुरुस्ती करण्यासाठी श्री  विश्वेश्वरय्या यांची मदत घेतली गेली. त्यांनी आतून दगडी अस्तर करून बंधारा पक्का करावा असा अहवाल दिला व तीन ते चार वेळा कोल्हापूरला भेटी देऊन तिथल्या इंजिनीयरांकडून  यशस्वीपणे हे काम करून  घेतले व कोल्हापूरवरील संकट टळले. त्या वर्षानंतर लगेच आलेल्या पुढच्या वर्षी सरासरीहून जास्त आणि प्रचंड पाऊस होउनही हा पाणीपुरवठा करणारा जलाशय अभंग राहिला. कोल्हापूरच्या महाराजांनी श्री  विश्वेश्वरय्या यांचे खास कौतुक केले. 


हैदराबादमध्ये खास मार्गदर्शक अभियंता म्हणून नेमणूक 
 
  निजाम संस्थानाला पूर्ण हैदराबादचे पुनरुथ्थान करायचे होते. शहराची आणि चादर घाट विभागाच्या सांडपाण्याची निर्गमन व्यवस्था करणे तसेच दरवर्षी आणि सातत्याने येणाऱ्या पुराच्या पाण्याचा बंदोबस्त करणे या कामात विश्वेश्वरय्या यांनी संस्थानाला मदत करावी आणि योग्य सल्ला द्यावा अशी सरकारची अपेक्षा होती.
         दिनांक 15 एप्रिल 1909  श्री विश्वेश्वरय्या यांनी ते पद ग्रहण केले व प्रथम आधीच्या वर्षी २८ सप्टेंबर १९०८ परिपूर्णला हैदराबादला जो पुराचा तडाखा  बसला होता त्याचा परिपूर्ण अभ्यास केला. हैदराबादमधून मुसी आणि ईसी नावाच्या दोन नद्या वाहतात.  सप्टेंबर १९०८ या महिन्यात शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या दोन नद्यांना महापूर येउन हाहाःकार उडाला होता. कित्येक इमारती जमीनदोस्त करत या पुराने २००० लोकांना जलसमाधी दिली होती. श्री विश्वेश्वरय्यानी या दोन नद्यांच्या उगमापासून या नद्या जिथे कृष्णा नदीला मिळतात तिथपर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले. त्यांनी तयार केलेल्या अहवालानुसार मुसी नदीवर हिमायत सागर धरण आणि ईसी नदीवर उस्मान सागर ही धरणे बांधली गेली. 


नद्यांच्या दोन्ही बाजूंच्या तीरांची शहरातून जाणाऱ्या नदीभागांची उंची वाढवण्यात आली नद्यांच्या दोन्ही बाजूंना शहरामध्ये उद्याने बांधण्यात आली आणि पार्क तयार केले गेले. सांडपाण्याची गटारे बांधून त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्याची तसेच धुळीपासून मुक्त असे प्रशस्त सिमेंट कॉंक्रीट रस्ते बांधण्याची सूचनाही श्री विश्वेश्वरय्या यांचीच होती आणि आजचे दिमाखदार हैदराबाद आणि सिकंदराबाद हे जुळे शहर त्याची साक्ष तुम्हाआम्हाला देत आहे. टी.डी. मकेज्झीसारखा अभियंता प्रथम एका भारतीयाच्या हाताखाली काम करण्यास तयार नव्हता पण हैदराबादच्या या प्रशंसनीय कामानंतर तोही श्री विश्वेश्वरय्या यांचा निस्सीम चाहता बनला आणि त्यांच्या हुशारी आणि कल्पकतेची त्याने पुढे प्रशंसाच केली .
म्हैसूर संस्थानचे  मुख्य अभियंता 

हैदराबाद येथे सल्लागार अभियंता म्हणून काम पाहत असतांनाच म्हैसूरचे दिवाण श्री व्ही पी मदन राव यांनी विश्वेश्वरय्या यांना म्हैसूर संस्थानाचे मुख्य  अभियंता होण्याची विनंती केली होती. १५ नोव्हेंबर १९०९  रोजी श्री विश्वेश्वरय्या म्हैसूर संस्थानचे  मुख्य अभियंता (चीफ इंजिनिअर) म्हणून कामावर रुजू झाले. आल्या आल्याच त्यांच्या असे लक्षात आले, की मरिनकवे धरणाचा पाणी पुरवठा अव्यवस्थित असून हजारो ग्यालन पाणी फुकट वाया  जात आहे. तेव्हा पुणे येथे यशस्वीरीत्या राबवलेली ब्लॉक सिस्टीम त्यांनी या मरीनकवे धरणासाठी वापरली. तत्कालीन संस्थानाचे अधिकारी आणि वैयक्तिक संधिसाधू शेतकऱ्यांचा विरोध पत्करूनही त्यांनी ब्लॉक सिस्टिमच धरणाचे पाणी चक्राकार फिरवण्यासाठी वापरली.

तंत्र शिक्षणासाठी असलेल्या श्री विश्वेश्वरय्या यांच्या रुचीकडे लक्ष ठेवून म्हैसूरच्या महाराजांनी तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिकीकरणासाठी  दोन उच्च स्तरीय समित्यांची स्थापना केली आणि केवळ श्री विश्वेश्वरय्या यांच्यामुळेच एक कॉन्फरन्स वर्षानुवर्षे या विषयावर परिसंवाद घडवत राहिली आणि म्हैसूर राज्यामध्ये अनेक औद्योगिक संस्था येऊ लागल्या. रेल्वेचे सरकारचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा श्री विश्वेश्वरय्या यांची नेमणूक झालेली होती. त्याचा सुयोग्य उपयोग करून श्री विश्वेश्वरय्या  यांनी  १५ वर्षे काही न काही मंजुऱ्या मिळण्याकरिता खोळंबलेली ही रेल्वेची कामे म्हैसूर  सरकारच्या अखत्यारीत आणली आणि रेल्वेच्या कामाना जोरदार चालना दिली. सन १९१२ साली त्यांना म्हैसूरच्या महाराजांनी “दिवाण” हे पद बहाल  केले. ते १९१९ सालापर्यंत दिवाण म्हणून कार्यरत होते. या काळात म्हैसूर सोप फ्याक्टरी, पेरासिटोईड ल्याबोरेटरी, भद्रावती येथील विश्वेश्वरय्या आयर्न अन्ड स्टील वर्क्स हे प्रकल्प सुरु झाले. ते  सुरु करण्यामागे  श्री विश्वेश्वरय्या यांचे अथक प्रयत्न कारणीभूत होते.  श्री विश्वेश्वरय्या यांनी तिरुमला ते तिरुपती या अंतरासाठी रस्ते बांधणीचे रेखांकनसुद्धा (Charting) आपल्या दिवाण असण्याच्या कारकीर्दीत केले.
विशाखापट्टणम या बंदर असणाऱ्या किनारपट्टीवरील शहराला समुद्राच्या रौद्र रूपापासून वाचवण्यासाठी जी सिस्टीम तयार करण्यात आली त्यात श्री विश्वेश्वरय्या यांचा महत्वाचा वाटा होता. म्हैसूर राज्यातील वृंदावन गार्डन  सुप्रसिद्ध आहे. या गार्डनची कल्पना श्री विश्वेश्वरय्या यांनाच सुचली आणि त्या गार्डनच्या निर्मितीचे ते  शिल्पकार ठरले. 

प्रत्यक्षात त्या  गार्डनचे काम १९२७ साली सुरु करण्यात आले आणि ते १९३२ साली पूर्ण देखील झाले. श्रीरंगपट्टणमपासून  दहा किलोमीटर अंतरावर कन्नमवाडी गावाजवळ कावेरी नदीवर धरण बांधण्याचे  त्यांनी नक्की केले. त्यासाठी कावेरी नदीच्या पाण्याचा स्त्रोत, नदीची कॅचमेंट एरिया तसेच धरणाच्या प्रत्यक्ष पाण्याखाली बुडणारी एरिया (सबमर्जन्स एरिया) यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कावेरी नदीवर ३५००मीटर लांबीचे धरण बांधण्याचे नक्की झाले. धरणाची जास्तीत जास्त उंची १२५  फूट असावी आणि धरणाचा पाया १११ फूट असावा असे त्यांनी ठरवले. त्यामुळे दीड लक्ष एकर जमीन ओलिताखाली येणार होती. या धरणाला कृष्णराज सागर धरण असे  नाव करण्यात आले. या धरणाची कॅचमेंट एरिया ४१०० चौरस मैल होती. श्री विश्वेश्वरय्या हे चीफ इंजिनिअर असताना हे काम सुरु होऊन पूर्णसुद्धा झाले.  त्या काळातील  आशिया खंडातील कृष्ण राज सागर हे धरण सर्वात मोठे धरण होते. आजही त्या धरणातून पूर्ण म्हैसूरला आणि  बहुतेक  सर्व बेंगळूरूला पिण्याचे पाणी पुरविले जाते . त्याचप्रमाणे हजारो एकर शेतीलासुद्धा पाणी मिळते.


श्री विश्वेश्वरय्या यांना फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर स्टेट असे म्हटले जाते. पूर्ण आयुष्यात त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. अनेक राज्यांच्या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर पदव्या दिल्या. इंग्रज सरकारने त्यांना कैसर ए  हिंद या पदवीने सन्मानित केले. १९५५ साली त्यांना सर्वोच्च मानाचा ” भारतरत्न ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. . सदैव सत्याची कास धरणारे आणि सतत कार्यरत राहून कधीही सत्ताधीशांची खुशमस्करी न करता योग्य तीच गोष्ट करणारे  श्री विश्वेश्वरय्या दि. १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी कैलासवासी झाले.