Headphones increase the risk of deafness

प्रवास करताना अनेकजण गाड्यांच्या आणि इतर आवाज ऐकण्याऐवजी इयरफोन्स (H
eadphones) किंवा हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकतात. मात्र आता या कृत्रिम ध्वनीप्रदुषणाचा धोका अधिक वाढत चालला आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार जगातील ११० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालानुसार कानामध्ये रोज हेडफोन टाकून मोठ्याने गाणी ऐकण्याची सवय असणाऱ्यांना बहिरेपणा येण्याचा धोका अधिक आहे.

जगातील ११० कोटी लोकांना बहिरेपणा येऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यातही हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत राहिला तर जगभरामधील १२ ते ३५ वयोगटातील तरुणांना लवकरच बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो असंही या अहवालात नमूद केले आहे.सामान्य व्यक्ती ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांसाठी किंवा १०० डेसिबलचा आवाज १५ मिनिटांसाठी सहन करु शकते. मात्र यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास कानातील आतील भागावर परिणाम होऊन बहिरेपण येऊ शकतो. दैनंदिन जिवनामध्ये एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा ६० डेसिबल इतक्या आवाजात असतो. हेडफोन्स वापरणाऱ्या जागतील एकूण तरुणांपैकी ५० टक्के तरुणांच्या कानावर सतत क्षमतेपेक्षा अधिक आवाज पडत असतो. ४० टक्के तरुणांच्या कानावर सतत क्लब्स आणि कॉन्सर्टला जाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे अधिक ताण पडतो.

सतत हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्यांच्या कानावर १०५ डेसिबल इतका आवाज पडत असतो. चार मिनिटांपेक्षा अधिक काळ एवढा मोठा आवाज कानावर पडत राहिल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. या वरुन तासनतास हेडफोन्स कानात घालून प्रवास करणाऱ्यांच्या कानावर काय परिणाम होत असेल हे स्पष्ट होते. क्लब आणि बारमधील गाण्यांचा आवाज हा ११० डेसिबल इतका असतो. इतका आवाज एका मिनिटापेक्षा जास्त वेळ कानावर पडणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. तर फटाक्यांचा आवाज या सर्वांहून अधिक म्हणजेच १५० डेसिबल इतका असतो. एकदा ऐकण्याची शक्ती गमावल्यानंतर ती पुन्हा मिळवता येत नाही. दैनंदिन जिवनातील सवयींमध्ये छोटा बदल केला तरी त्यांना बहिरा होण्याचा धोका टाळता येईल.