Avoid using each other's items, these are the dangers

अनेकांना एकमेकांच्या वस्तू वापरण्याची सवय असते. अगदी लहानपणी सुद्धा खेळणी, कपडे, खाऊ अशा गोष्टी शेअर केल्या जातात. यापैकी खाद्यपदार्थ शेअर करणे ठीक आहे. परंतु, एकमेकांच्या वस्तू वापरणे चांगले नाही. मन कितीही मोठे असले, व्यक्ती कितीही जवळची असली तरी काही वस्तू एकमेकांना शेअर करणे टाळावे. कारण यामुळे अनेक त्रास होऊ शकतात. एकमेकांच्या कोणत्या गोष्टी वापरू नयेत याविषयी आपण माहिती घेऊयात.

अनेकदा मैत्रिणी एकमेकींची लिपस्टिक किंवा लिपबाम वापरतात. मैत्रिणीने लावलेला शेड आवडल्याने ट्राय करण्यासाठी तो शेड घेऊन स्वतःच्या ओठांवर लावला जातो. अशाप्रकारे लिपस्टिक शेअर केल्यामुळे हरपीज सारखा आजार होऊ शकतो. नेहमी लिपस्टिकची टॉप लेअर स्वच्छ स्वच्छ केली पाहिजे. तसेच आंघोळीसाठी लोफह वापरत असाल तर तो कुटुंबातील अन्य कोणासोबतही शेअर करू नये. यामुळे रॅशेज, स्किन अ‍ॅलर्जी होऊ शकते.

मस्करा, काजळ आणि फेस पावडर यांसारखे कॉस्मेटिक प्रोडक्ट्सही शेअर करू नये. पार्लरमध्ये तयार होताना हायजिन मेन्टेन केले पाहिजे. साबणामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात म्हणून साबण एकमेकांसोबत शेअर करू शकतो, हा गैरसमज आहे. साबणामध्ये बॅक्टेरिया असू शकतात. साबण शेअर केल्यामुळे ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जातात. म्हणूनच त्वचारोग झालेल्या व्यक्तीचा साबण वेगळा ठेवण्यास डॉक्टर सांगतात. टॉवेलही एकमेकांचा वापरू नये. कारण टॉवेलला आपण घाण आणि शरीरावरील ओलावा पुसत असतो. यामुळे स्किन इन्फेक्शन होऊ शकते.

तसेच ईयरफोन्स शेअर करणेही चांगले नाही. अनेकदा दोन मित्र एकच ईयरफोन लावून गाणी ऐकतात. असे करणे टाळले पाहिजे. कारण ईयर वॅक्समध्ये अनेक प्रकारचे जम्र्स आणि बॅक्टेरिया असतात. ईयरफोन शेअर केल्यास कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकते. अनेकदा केस ठिक करण्यासाठी एकमेकांचे हेअरब्रश वापरले जातात. यामुळे केसांच्या समस्या उद्भवतात. तसेच त्वचेच्या समस्यांही निर्माण होऊ शकतात.